सांगली : दालमिया भारत शुगर निनाईदेवी युनिटमध्ये गेल्या तीन वर्षांपासून स्मार्ट ॲग्री प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना हवामान आधारित सल्ला दिला जातो. मिस्ड कॉल अलर्ट व मेसेज माध्यमातून हवामानाची सद्य:स्थिती, खत नियोजन व उसावरील रोग किडी, वापरावयाची खते, औषधे यासंदर्भात माहिती दिली जाते. आता या शाश्वत ऊस उत्पन्नवाढीच्या कार्यक्रमाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जाईल. कृषी विज्ञान केंद्र, बारामती व ‘व्हीएसआय’च्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या मालकीच्या क्षेत्रावर एआय तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती दालमिया शुगरचे (युनिट हेड- निनाईदेवी) संतोष कुंभार यांनी दिली.
युनिट हेड संतोष कुंभार म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ व मायक्रोसॉफ्ट यांच्याबरोबर करार केला आहे. एआयचा वापर केल्याने शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पादन वाढून त्यांना दोन पैसे जास्त मिळणार आहेत. कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील प्रायोगिक तत्त्वावरील कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बारा महिन्यांच्या को-८६०३२ सारख्या वाणाला एकरी ११० टन, तर कोएम- ०२६५ या वाणाला एकरी १५० टन असे उत्पादन मिळाले आहे. हे परिणाम खरोखरच आशादायक आहेत. सध्या साखर उत्पादन घटल्याने सर्वच कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र दालमिया व्यवस्थापनाच्या काटेकोर नियोजन व अंमलबजावणीमुळे ऊस उताऱ्यामध्ये गतवर्षीपेक्षा प्रगती साधता आल्याने ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देता येईल. आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून आम्ही निनाईदेवीच्या शेतकऱ्यांना केवळ ऊस उत्पादन वाढवण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी काम करत आहोत.