सांगली : हळद, गूळ आणि बेदाणा सौद्यासाठी प्रसिद्ध सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. येथील बाजार कर्नाटककडे जात आहे. यामुळे हमालावर उपासमारीची वेळ येत असल्याने हमाल आक्रमक झाले. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन होते, कोल्हापूरच्या बरोबरीने सांगली बाजार समितीमध्येही गुळाची आवक होत होती. यंदा मात्र येथील गूळ उत्पादन व्यवसाय कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी होवू लागली आहे.
सांगलीतील गुळाचा व्यापार कर्नाटकात जात असल्याबाबतचा आक्षेप घेत गुरुवारी सकाळी हमाल आक्रमक झाले. याविरोधात सौदे बंद पाडले. गुळाच्या व्यापाराबाबत तत्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हमाल पंचायतच्या वतीने देण्यात आला. यावेळी हमाल नेते विकास मगदूम, बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्यासह हमाल बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.
गूळ सौद्यांबाबत खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊ : शिंदे
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालांनी आंदोलन केल्यानंतर सभापती सुजय शिंदे यांनी तातडीने बैठक घेतली. या प्रश्नावर लवकरच खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत व्यापारी व हमाल प्रतिनिधींची बैठक घेण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. गुळाचे सौदे बंद करू नका, असे आवाहन त्यांनी केले. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी सांगली बाजार समितीमध्ये गुळाची हमालांची समजूत काढल्यानंतर सौदे पूर्ववत सुरु झाले. समितीमध्ये हमाल प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेवून चर्चा करण्यात आली. सभापती शिंदे यांनी बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे सुरळित ठेवण्याची विनंती केली. हमालांचे नेते विकास मगदूम यांनी गुळाचे सौदे सुरु राहण्यासाठी सरकार, बाजार समितीने वेळीच उपायोजना करण्याची मागणी केली. या बैठकीला संचालक काडाप्पा वारद, प्रशांत पाटील, माजी संचालक बाळासाहेब बंडगर, व्यापारी, बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण उपस्थित होते. बाजार समितीच्या सेसबाबत विचार केला जाईल. बाजार समितीत गुळाची आवक वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे शिंदे यांनी सांगितले.