सांगली : दालमिया भारत शुगर युनिट, निनाईदेवी साईट करुंगली (आरळा) कारखान्यामार्फत कारखाना कार्यक्षेत्रातील गटनिहाय निवडक शंभर ऊस शेतकऱ्यांसाठी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आधुनिक ऊस शेती प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच झाले. यामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी सहभागी शेतकऱ्यांना प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात आले.
दालमिया भारत शुगर कारखान्यातर्फे गेल्या चार वर्षांपासून युनिट हेड संतोष कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक ऊस शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. याअंतर्गत पुण्यात झालेल्या कार्यक्रमास मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील, ऊसविकास अधिकारी युवराज चव्हाण आदींसह शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना आधुनिक ऊस शेती, जैवविविधता, बदलत्या हवामानानुसार ऊस शेतीचे नियोजन, मातीचे आरोग्य, योग्य पाणी व्यवस्थापन, शेती अवजारे, रोपवाटिका विकास, ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आदींबाबत प्रयोगातून सिद्ध झालेले आधुनिक ऊस तंत्रज्ञान व माहिती प्रत्यक्ष प्लॉट भेटीदरम्यान शेतकऱ्यांना मिळाली.