सांगली : गूळ, हळद खरेदी विभागातील हमाली व महिला कामगार मजुरी दरवाढीबाबत सांगली बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी प्रतिनिधी, हमाल प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. मजुरी कराराची मुदत ३१ डिसेंबर २०२५ अखेर आणि महिला कामगार मजुरी कराराची मुदत ही २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राहील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सभापती सुजय शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गुळ बॉक्सच्या हमाली मजुरीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही.
गूळ खरेदी विभागाकडील हमाली मजुरीमध्ये ७.५० टक्के वाढ करण्यात आली. गूळ मोठे रवे माप टाकणे, अगर काढणे १ एक रुपया व मोटार भरणे १.२५ रुपया अशी वाढ झाली. बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, संचालक संग्राम शिंदे, प्रशांत पाटील-मजलेकर, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, हळद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा, गूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद शहा आणि हळद व गूळ खरेदीदार व्यापारी कौशल शहा, धनाजी जाधव, हार्दिक सारडा, मारुती बंडगर, विकास मगदूम, बाळासो बंडगर आदी उपस्थित होते.