सांगली : शिराळा तालुक्यातील चांदोली व मोरणा धरणांतील पाणीपातळी घटली आहे. इतर धरणांतील कमी पाण्यासाठ्यामुळे तसेच पाऊस कमी झाल्याचा परिणाम तालुक्यातील ऊस क्षेत्रावर झाला आहे. ऊस क्षेत्रात जवळपास २५ ते ३० टक्क्यांची घट होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कारखान्यांना उसासाठी कसरत करावी लागणार आहे. वारणाकाठचा अपवाद वगळता ऊस पट्ट्यात परिस्थिती गंभीर आहे. ऊस तोडणीनंतर नवीन लागणी मात्र झालेल्या नाहीत.
सद्यस्थितीत तालुक्यात काही शेतकऱ्यांच्या धरण व विहिरीवर स्वतःच्या पाणी योजना आहेत. ते शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांना भागाने पाणी देत होते. त्यांच्याच क्षेत्राला पाणी पुरेल का नाही अशी अवस्था आहे. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम ऊस पिकावर झाला आहे. हंगामात बहुतांश ठिकाणचा ऊस वाळला होता. वाढ खुंटली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना चारा म्हणून असा ऊस तोडला. त्यानंतर नवीन ऊस लागवडी तुरळक झाल्या आहेत.