सांगली : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकारने मान्यता दिली आहे. आतापर्यंत राज्यातील २५७ पात्र लाभार्थीनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी ११६ लाभार्थीना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. उर्वरीत १४१ ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी केंद्र सरकारने लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी ‘दत्त इंडिया’चे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंगे यांनी केली आहे. केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमणार, केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सहसचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत केंद्र सरकारकडे फेरप्रस्ताव सादर करावा, अशी सूचना या बैठकीत केली. मजुरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे भविष्यात ऊसतोडणी यंत्रावरच साखर कारखानदार तसेच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे; अन्यथा ऊसतोडणीची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. त्याला पाठबळ देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, सांगली जिल्ह्यात ३०० हून अधिक यंत्रे कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.