सांगली: येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सभासदांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येत आहे. मात्र ही वाटप यंत्रणा अडथळ्यांशी शर्यत ठरली आहे. कारखान्याने गावोगावी साखर पोहोच करावी किंवा कारखाना कार्यस्थळावर सभासदांना त्रास होणार नाही अशी योग्य यंत्रणा उभी करावी अशी मागणी शेतकरी, सभासदांकडून करण्यात येत आहे. साखर वाटपात गैर नियोजनाचा फटका सभासदांना बसत आहे. अनेकांना दोन दिवसांचा वेळ या कामासाठी घालवावा लागला आहे. त्यामुळे सभासदांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कारखान्याच्यावतीने सभासदांना १६ रुपये किलो दराने ५० किलो साखर देण्यात येत आहे. सांगली विभागातील ३२ गावातील सभासदांना २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान साखर वाटप सुरु आहे. मात्र, त्यातील अडचणींमुळे सभासद हैराण झाले आहेत. दरम्यान, गावातील सभासदांची साखर २८ रोजी वाटप करण्यात येईल. सर्वच गटांतील उर्वरित सभासदांची साखर वाटप २८ ते ३१ ऑक्टोबरअखेर दिली जाणार असल्याची माहिती सुधारित परिपत्रकाद्वारे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी दिली आहे.