सांगली : आडसाली ऊस उत्पादनामध्ये सध्या सगळीकडे एकरी १०० टन उत्पन्न काढण्याची स्पर्धा लागल्याची दिसत आहे, मात्र आडसाली उसाएवढेच खोडवा ऊस व सुरू ऊस लावणदेखील तितकीच फायदेशीर असल्याचे मत कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी व्यक्त केले. ते धनगाव, ता. पलूस येथे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या ऊसपीक परिसंवाद कार्यक्रमात बोलत होते.
माने म्हणाले की, सुयोग्य खोडवा व्यवस्थापन करून खोडवा पीक ठेवले तर उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. कारखान्याने ऊस उत्पादकांसाठी पाचट कुजविणारे जीवाणू, फवारणी व आळवणीकरिता जैविक औषधांची उपलब्धता, तसेच उसामध्ये आंतरपीक घेण्यासाठी तागासारखी हिरवळीची पीक बियाण्याची उपलब्धता करून दिली आहे.
सुरू ऊस लावणीसाठी प्रमाणीत बियाण्यापासून तयार केलेली ऊस रोपे बांधपोहोच देण्याची सुविधासुद्धा कारखान्यामार्फत उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. रुंद सरी पद्धत, रोप लावण, एकात्मिक खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन या बाबींमुळे सुरू उसाचेसुद्धा उत्पादन चांगले येत असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रास्ताविक कारखान्याचे ग्री ओव्हरशीयर हेमंत सूर्यवंशी यांनी केले. यावेळी कारखान्याच्या विविध ऊस विकास योजनांची माहिती ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे यांनी दिली. यावेळी सतपाल साळुंखे, संदीप यादव, हणमंत यादव आदी ऊस उत्पादक शेतकरी, शेती विभागातील अधिकारी, कर्मचारी संख्येने उपस्थित होते.