सांगली : उसावर लोकरी माव्याच्या प्रादूर्भावाने शेतकरी हतबल

सांगली : हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा पाऊस थांबल्यानंतर काही दिवसांतच लोकरी माव्याची कीड आली असून या किडीचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. लोकरी माव्याने उसाची पाने पांढरी तसेच वाडे काळे पडले आहेत. ही कीड उसातील हरितरस शोषून घेत असल्याने उसाची वाढ खुंटत आहे. ऊसाला लोकरी माव्याने विळखा घातल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त होत आहे. आडसाली ऊस उंच असल्याने औषध फवारणी करणेही अवघड असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात याचा प्रादूर्भाव होताना दिसून येत आहे.

सद्यस्थितीत कडेगाव तालुक्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. लोकरी माव्याचे संकट वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या संकटाचा परिणाम साखर उद्योगावरही होणार असल्याने कारखान्यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणीचे प्रात्यक्षिके देऊन प्रसंगी औषध पुरवठाही होणे गरजेचे आहे. यापूर्वी संकटकाळात लोकरी मावा खाणारी मित्र कीड विकसित झाली आहे. ही मित्र कीड परिसरात मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी येथील साखर कारखान्याकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे शेतकरी वर्गातून व्यक्त केले जात आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे सूर शेतकरी वर्गातून उमटला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here