सांगली / कोल्हापूर : डालमिया भारत शुगरचे, युनिट निनाईदेवी (ता. शिराळा) व आसुर्ले पोर्ले, (ता. पन्हाळा) आणि नवी दिल्लीतील सॉलिडरीडॅड रिजनल एक्स्पर्टीज सेंटरमार्फत पुनर्विकसित शेती व शाश्वत ऊस विकास प्रकल्प गेली तीन वर्षे सुरू आहे. या अनुषंगाने इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सहकार्याने नवी दिल्लीत कोईलेशन फॉर रिस्पॉन्सिबल शुगरकेन इंडिया संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये डालमिया भारत शुगरच्या शेतकऱ्यांचा केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, निमुबेन जयंतीभाई बांभानिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डालमिया भारत शुगरचे सीईओ पंकज रस्तोगी, सॉलिडरी डॅडचे शुगरकेन लीड मो. दिलशाद, निनाईदेवी युनिटचे सिनियर मॅनेजर केन युवराज चव्हाण आदी उपस्थित होते. शाश्वत ऊस विकास योजनेमध्ये सातत्यपूर्ण सहभाग व कामगिरीसाठी सर्वोत्तम शेतकरी म्हणून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये राज्यातून स्वाती पावले (पावलेवाडी), संदीप चव्हाण (इनामवाडी), मिलिंद पाटील (पिसात्री) या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमात बांभानिया यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. डालमिया भारत शुगरने या योजनेच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढविणे, ऊस पिकासाठी पाण्याची बचत, सेंद्रिय, जैविक व रासायनिक खतांचा संतुलीत वापर, गांडूळ खत निर्मिती, ग्रीन हाऊस गॅसेस प्रतिबंधासाठी ऊसाचे पाचट जाळण्याऐवजी त्यापासून जैविक खते वापरून कंपोस्ट खत निर्मिती, सुधारित बियाणे निवड, आंतरमशागत व योग्य ऊस संख्या याविषयी जागृती करून ऊस उत्पादन वाढीचे प्रयत्न केले आहेत. त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.