सांगली : शेतकरी कर्जमाफी, दुधासह सर्व शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणे, शेतीपंपाला दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळणे, उसाला प्रतिटन ५,००० रुपये भाव दोन साखर कारखान्यांत हवाई अंतराची अट रद्द करणे, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करणे, खते खरेदी करताना लिंकिंग रद्द करणे या संदर्भात शेतकरी संघटनेने सरकारला मोर्चा काढून वेळोवेळी निवेदने दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने इस्लामपूर येथे शेतकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, इस्लामपूर येथे साखरेचे ट्रक अडवले.
शेतकरी संघटनेचे शंकरराव मोहिते, लक्ष्मण पाटील, केतन जाधव, अरुण पाटील, सयाजी पाटील, संदीप पाटील, रवींद्र पिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन झाले. साखर कारखान्याची साखर, दूध संघाचे दूध, कृषी उत्पन्न बाजार समितीचा माल पुणे, मुंबईच्या मार्केटला पाठवू नये, याबाबत शेतकरी संघटनेने राजारामबापू पाटील साखर कारखाना, दूध संघ, पोलिस निरीक्षक (इस्लामपूर), हुतात्मा साखर कारखाना (वाळवा) यांना निवेदन देण्यात आले होते. सरकारने या प्रश्नांकडे १४ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देऊनही दुर्लक्ष केल्याने आंदोलन करण्यात आले. यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..