सांगली : ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर फायदा देणारा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ४० टक्के उत्पन्न वाढ तर, ३० टक्के उत्पादन खर्चात बचत झाल्याचे सिद्ध झाले आहे. ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यात अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व नेटाफिम कंपनीच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व भविष्यातील ऊस शेती विषयावर स्मार्ट शेतकरी संमेलनावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरुडकर प्रमुख उपस्थित होते. अध्यक्ष नाईक म्हणाले की, नव तंत्रज्ञानाच्या वापरासाठी समूह शेतीचा प्रयोग राबविण्याचा विचार संचालक मंडळ करत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊसशेती क्षेत्रात सुरू झाला असून, फायदेशीर व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनीही बदलण्याची गरज आहे. कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांच्या प्रगतीचा व हिताचा विचार जपला आहे.
यावेळी नेटाफिमचे कृषितज्ज्ञ अरुण देशमुख यांनी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड द्यावी. दर तीन वर्षांनी ऊस बियाणे बदलावे असा सल्ला दिला. बारामतीचे कृषी तज्ज्ञ डॉ. संतोष देशमुख यांनी बारामती येथील प्रयोगात एकरी १५० टनांपर्यंत उसाचे उत्पादन मिळाले आहे असे सांगितले. विराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले. कार्यकारी संचालक अमोल पाटील, आजी, माजी संचालक, सभासद, शेतकरी कारखान्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.