सांगली : विश्वास कारखान्याने ५० टनापेक्षा जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर सुवर्ण बक्षीस योजनेत तालुक्यातील विश्वनाथ जगन्नाथ पाटील (कापरी), शाहूवाडी तालुक्यातील सुभाष सर्जेराव पाटील (शिंपे) हे प्रत्येकी एक तोळा सोन्याचे मानकरी ठरले. चिखली येथील कारखाना स्थळावर झालेल्या वार्षिक सभेत ही सोडत काढण्यात आली. चार गटात प्रत्येकी तीन यांप्रमाणे ४३६ शेतकऱ्यांमधून १२ शेतकरी भाग्यवान विजेते ठरले. त्यांना ६० ग्रॅम (६ तोळे) सोने बक्षीस मिळाले. कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, उपाध्यक्ष, बाबासाहेब पाटील, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक, संचालक विराज नाईक व कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विश्वास कारखान्याने जाहीर केलेल्या योजनेत ४० ते ४९ टनापर्यंत ऊस पुरवठा करणाऱ्या गटात विलास संभाजी मोरे (पलूस ), अप्पासो बाजीराव पाटील (तांबवे, ता. कऱ्हाड), ललिता चंद्रकांत पाटील (नांद्रे, ता. मिरज) हे शेतकरी प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याचे विजेते ठरले. तर ३० ते ३९ टन ऊस पुरवठा गटात दीपक शामराव डवंग (वाडीचरण), भगवान नारायण ठमके (ठमकेवाडी) व ज्ञानदेव रामचंद्र पाटील (वडगाव, तिघेही ता. शाहूवाडी) हे प्रत्येकी ३ ग्रॅम सोन्याचे विजेते ठरले. २० ते २९ टनापर्यंत ऊस पुरवठा गटात महेश नथू कांबळे (तांबवे, ता. कऱ्हाड), प्रकाश बाळू गायकवाड (फुपेरे) व तानाजी गणपती पाटील (पाचुंब्री, दोघे ता. शिराळा) हे २ ग्रॅम सोन्याचे विजेते ठरले. शेती अधिकारी ए. ए. पाटील, सहाय्यक ऊस विकास अधिकारी संदीप पाटील, विवेक यादव यांच्यासह सर्व कृषी पर्यवेक्षक, गट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी कष्ट घेतले.