सांगली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे काटेकोर मूल्यमापन करून ऊस विकास संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. आमदार अरुण लाड यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे हे यश साध्य झाले. सर्वांच्या सहकार्याने देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष लाड यांनी सांगितले की, नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. यातीलच एक ऊस उत्पादकता हा पुरस्कार कारखान्याने मिळवला आहे. या क्षेत्रात केलेले भरीव काम, नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून केलेल्या ऊस क्षेत्रातील आधुनिक क्रांतीमुळे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑगस्टमध्ये नवी दिल्लीत यंदाच्या वर्षीचा पारितोषिक वितरणाचा विशेष सोहळा होईल. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, दिलीप पार्लेकर, विलास जाधव उपस्थित होते.