सांगली : यंदा केवळ तीन महिने ऊस गळीत हंगाम चालला. चालू वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे उसाची वाढ म्हणावी तशी झाली नाही. उसाच्या वजनात घट आली आहे. त्यामुळे सरासरी एकरी दहा ते बारा टन ऊस उत्पादन घटले आहे. याचबरोबर ऊस तोडणी हंगाम कमी काळ चालल्यामुळे ऊस तोडणी मशीन, ट्रॅक्टर मालक व मजूर या सर्वच घटकांना मोठा फटका बसला आहे. वाहनधारक व मजुरांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या काळात उशिरा कारखाना चालू होऊन लवकर बंद होण्याची पहिलीच वेळ आहे.
या भागातील ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या यंत्रणेला चालू हंगाम आतबट्ट्याचा ठरला आहे. गेल्यावर्षी ट्रॅक्टरने कारखान्यांना सरासरी २५०० ते ३००० टनाच्या दरम्यान ऊस वाहतूक केली गेली होती. तर ऊस तोडणी मशीनने १४ ते १५ हजार टन ऊस तोडून कारखान्यास पाठवला होता. परंतु यावर्षी ट्रॅक्टर मालकांनी बाराशे ते पंधराशे टनाच्या दरम्यान ऊस तोडला आहे. तर ऊस तोडणी मशीनने पाच ते सहा हजार टनच ऊस गळीतास पाठवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने व्यवसाय झाला आहे. त्यामुळे कर्जे काढून घेतलेल्या मशीनचे, ट्रॅक्टरचे हप्ते भरणे देखील अशक्य झाल्याचे अनेकांनी सांगितले. याबाबत इटकरे येथील ऊस तोडणी मशीन मालक सुभाष काळे म्हणाले की, ऊस तोडणी मजूर फसवतात म्हणून तोडणी मशीन घेतलं. मात्र, यावर्षी केवळ पाच हजार टनाच्या आसपास ऊस तोडून गळितास पाठवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत फारच धंदा कमी झाला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.