सांगली : माणगंगा साखर कारखाना कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तो विक्रीस काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्याने हा कारखाना नवीन सहकारी संस्थेच्या नावावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. साखर कारखाना घेताना स्थावर मालमत्ता, बॅलन्स सीटवर नोंद असलेली सर्व देणी, तसेच शेतकरी कामगारांची देणी देण्याची जबाबदारी स्वीकारणार असल्याची घोषणाही देशमुख यांनी यावेळी केली. थकीत कर्जापोटी बँकेने कारखाना ताब्यात घेतला, तेव्हाच कारखान्यावरील सभासदाची मालकी संपली असेही ते म्हणाले.
अमरसिंह देशमुख यांनी सांगितले की, कारखान्याची बँकांची देणी, कामगार, शेतकऱ्यांची देणी, दुरुस्ती आणि नंतर कारखाना सुरू करून कर्ज परतफेड करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. मात्र कारखान्याशी असलेले भावनिक नाते आणि अस्मितेसाठी घेण्याचा विचार केला आहे. नवीन काढलेल्या सहकारी संस्थेच्या नावावर कारखाना घेणार आहे. इतरांनी कारखाना घेतला तर ते मालमत्तेवर नोंदवलेल्या कर्जाची जबाबदारी घेतील. पण बॅलन्स शीटवरचे कर्ज, अन्य देण्यांचा विचार करतीलच असे नाही. आम्ही मालमत्तेवर नोंद आणि बॅलन्स शीटवरील कर्ज, शेतकरी, कामगार, शासकीय देण्यांची जबाबदारी स्वीकारून कारखाना घेणार आहे. कारखाना लगतच्या जमिनीत मळीमिश्रित पाणी, बगॅस पसरलेले असते. परिसरात दुर्गंधी पसरते. प्लॉट कोणीही घेणार नाहीत. त्यामुळे प्लॉट पडून विकण्याचा प्रश्नच नाही.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.