सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षी ६.५० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रती दिनी ५१०० टन गाळप सुरू असून आतापर्यंत १.४१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.६७ टक्के साखर उताऱ्याने १.४३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हुतात्मा कारखान्याने नेहमीच उच्चांकी दर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. चालू गळीत हंगामाकरिता गाळपासाठी येणाऱ्या उसाला पहिला हप्ता ३२०४ रुपये दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केली.
अध्यक्ष वैभव नायकवडी म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामात साखरेच्या दरात ४०० ते ५०० रुपये क्विंटल घसरण होऊन हा दर ३३०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत आला आहे. साखरेच्या दरात आणखी घसरण होईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वी प्रती क्विंटल ३८०० रुपयांपर्यंत दर गेला होता. एफआरपी व एमएसपी दरात मोठी तफावत राहत असलेने कारखानदारी अडचणीत आली आहे. ३१०० रुपयांच्या एमएसपीमध्ये सर्व खर्च भागविणे शक्य नाही. केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढ करून तो किमान ४२०० प्रतिक्विंटल करावा. यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव मुकेश पवार, मॅनेजर के. एन. शेटे, चीफ केमिस्ट बी. एस. माने, शेती अधिकारी सर्जेराव वावरे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.