सांगली : वाळवा तालुक्यातील शकुंतलानगर वाघवाडी येथील २५०० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला एन. डी. पाटील शुगर हा कारखाना येत्या दहा दिवसांत पहिला ट्रायल गळीत हंगाम प्रारंभ करणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील व केदार पाटील यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या प्रथम बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३३०० रुपये प्रती टन असा उच्चांकी दर देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. संचालिका अंजली पाटील, मिलिंद पाटील, धनंजय पाटील, मुकुंद पाटील, सर्जेराव बोडरे, समीर तांबोळी आदी उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, चालू वर्षी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात गळीतासाठी उसाची नोंद झाली होती. मात्र आमचा गळीत हंगाम सुरू होण्यास थोडासा उशीर झाला. येत्या दहा ते बारा दिवसांत आम्ही यावर्षीचा ट्रायल सीजन घेणार आहे. उसापासून जागरी, सहवीज निर्मिती पहिल्या गळीत हंगामात सुरू करत आहोत. भविष्यात आम्ही डिस्टलरीही सुरू करणार आहे. वाळवा तालुका व परिसरातील इतर जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये उसाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. ही गरज ओळखून आम्ही कारखान्याची उभारणी केली आहे. गेल्या दोन वर्षापासून कारखान्याची उभारणी सुरू होती. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले. आमची कोणत्याही कारखान्याशी स्पर्धा असणार नाही. शेतकऱ्यांनी कोणत्याही वजन काट्यावरुन उसाचे वजन करून आणल्यास आम्ही तो ऊस स्वीकारू.