सांगली : ऊस वाहतूक करताना वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, अपघात होऊ नये यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर बसवावेत, असे मार्गदर्शन उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत करण्यात आले. येथील श्री दत्त इंडिया कंपनी अर्थात वसंतदादा कारखान्याच्या कार्यस्थळावर हा मार्गदर्शनात्मक कार्यक्रम झाला. श्री दत्त इंडिया कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले. सर्व वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन विभागाचे नियमाचे पालन करण्याबाबत सूचना यावेळी कारखान्याच्या वतीने करण्यात आल्या.
उप प्रादेशिक परिवहन विभागाचे आकाश गालिंदे व सौरभ दडस यांनी सर्व वाहनचालकांना ऊस वाहतूक करताना रस्त्यामध्ये अपघात होऊ नये, याकरीता वाहन कसे चालवावे याविषयी टिप्स दिल्या. वाहनामध्ये मोठ्या आवाजात टेप लावू नये, रिफ्लेक्टर बसवावे, वाहन परवाना व वाहनाची सर्व कागदपत्रे ठेवण्याची सूचना केली. दारु पिऊन वाहन चालवू नये अशी सक्त ताकीद दिली. परिसरामध्ये कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षता शेती विभागाचे कर्मचारी व संबंधित वाहतूक कंत्राटदारांनी घ्यावी अशा सूचना कारखान्याच्यावतीने करण्यात आल्या. कंपनीचे केन मॅनेजर मोहन पवार, दीपक शिंदे, संजय पवार यांच्यासह पदाधिकारी आणि वाहन चालक-मालक, बैलगाडी कंत्राटदार उपस्थित होते.