सांगली : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्यावतीने पेठ (ता. वाळवा, जि. सांगली) येथे १२ वी ऊस परिषद शुक्रवारी (28 फेब्रुवारी) आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने ऊस प्रदर्शन, उसावरील विविध प्रकारच्या मार्गदर्शनासह संघाच्यावतीने राज्यातील प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकारांचा ऊस कार्य गौरव पुरस्कारांचे वितरणही होणार आहे. पेठ येथील शिराळा रोडवरील जनाई गार्डन येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील, संयोजक युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष माने-पाटील म्हणाले की, शेतकरी संघटनेचे नेते, रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते आणि केळी उत्पादक संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. ऊस तज्ज्ञ सुरेश उबाळे, जैन इरिगेशनचे शामकांत पाटील, महेंद्र घाटगे, अनंत निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी उपसंचालक नामदेव परिट, कृषी अधिकारी संजय पाटील, सचिन पाटील, आशिष पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ऊसभूषण, ऊसकार्य गौरव, ऊससंदेश पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी ज्ञानेश्वर मोंढे, धनाजी कदम, संतोष पाटील, बाळासो सलगर, तुषार सलगर, रोहन पाटील, तुषार शितोळे, सागर पाटील, बाळासाहेब पडवळ, कल्याण जाधव, राजेंद्र कोळेकर, संजय जगताप, विजय कोकरे यांना ऊसभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.