सांगली : एकरी १२७ टन ऊस पिकवणाऱ्या रामदास पोळ यांचा ‘ऊसभूषण’ पुरस्काराने सन्मान

सांगली : कडेगाव तालुक्यातील सासपडे येथील प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी पोळ यांनी सन २०२३-२४ च्या हंगामात पूर्वहंगामी उसाचे हेक्टरी ३१९.८१ टन (एकरी १२७ टन) इतके उच्चांकी उत्पादन घेतले होते. या विक्रमी ऊस उत्पादनाबद्दल त्यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ‘व्हीएसआय’कडून राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार मिळाला. व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. मानपत्र व १ लाख रुपये रोख पुरस्कार देण्यात आला. ऊस उत्पादक शेतकरी पोळ हे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे सभासद आहेत.

सोनहिरा साखर कारखान्याच्या डेमो प्लॉट योजनेत हा प्लॉट समाविष्ट करून घेऊन कारखान्यामार्फत ऊस विकास योजनेंतर्गत या प्लॉटला ‘व्हीएसआय’ चे निवृत्त शास्त्रज्ञ एस. बी. माने-पाटील यांनी मार्गदर्शन केले. पोळ यांना ऊस लागणीपासून तोडणीपर्यंत आवश्यक माती परीक्षण, खत व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण व फवारणी वेळापत्रक यांचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याचे पोळ यांनी सांगितले. आमदार विश्वजित कदम, अध्यक्ष व माजी आमदार मोहनराव कदम, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, संचालक शांताराम कदम, रघुनाथराव कदम, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम यांनी पोळ यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here