सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याकडून ऊस तोडणी करार सुरू

सांगली : येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्यासाठी मागील हंगामात सर्व वाहतूकदारांनी पुरेशी मजूर संख्या असलेल्या टोळ्या हजर केल्या होत्या. कारखान्याकडून वाहतूकदारांनी घेतलेला ॲडव्हान्स मजुरांपर्यंत एप्रिल ते मेमध्ये दिल्याने टोळ्यांच्या फसवणुकीचे प्रमाण कमी झाले. कारखान्याची वाढीव उभारणी झालेल्या क्षमतेप्रमाणे प्रतिदिन दहा हजार टन ऊस पुरवठा होऊन यंत्रणा शिल्लक राहत होती, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक आमदार अरुण लाड यांनी केले. कारखान्याच्या आगामी गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊस तोडणी, वाहतूक करार प्रारंभ मार्गदर्शक आमदार अरुण लाड, अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

प्रातिनिधिक स्वरुपात मोहन लाड, रामदास यादव, विकास पवार, रावसाहेब पाटील, महादेव माळी, प्रदीप मोरे, आप्पासो पवार, रमेश भातमारे, विजय यादव यांच्या कराराची पूर्तता करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, वाहनधारक, ऊसतोड मजुरांच्या मदतीसाठी क्रांती कारखाना नेहमीच पुढे असतो. दोन वर्षांपूर्वी शासनाने ऊस तोडणी मजुरी दरात ३४ टक्के वाढ दिली. त्यावेळी क्रांती कारखान्याने राज्यात पहिल्यांदा वाहतूकदारांना १५ टक्के वाहतूक दरवाढ दिली आहे. मागील हंगामाप्रमाणे लवकर करार व ॲडव्हान्स देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वाहतूकदारांनी चांगल्या मजूर टोळ्या आणाव्यात. संचालक दिलीप थोरबोले, अशोक विभूते, विजय पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, अधिकारी, कर्मचारी व वाहतूकदार उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांनी स्वागत केले. ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here