सांगली : सोनी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळे (कोल्हापूर विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. कारखान्याच्या अध्यक्षपदी शैलजा पाटील यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी पंडित पाटील (सोनी) यांची बिनविरोध निवड झाली. येत्या पाच वर्षात हा कारखाना उभारला गेलाच पाहिजे, या जिद्दीने सर्व संचालक मंडळ कामाला लागेल असा विश्वास नूतन अध्यक्षा शैलजा पाटील यांनी व्यक्त केला.
अध्यक्षपदी निवडीनंतर शैलजा पाटील म्हणाल्या की, कारखाना उभारून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे प्रकाशबापू पाटील यांचे स्वप्न साकार करूया. त्यासाठी सर्वांनी सामूहीक प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक जगन्नाथ देसाई यांनी आभार मानले. विशेष लेखापरीक्षक शीतल चौथे, व्ही. एम. पाटील, वसंतदादा कारखाना उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, वसंतदादा कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील, संचालक बळवंत यमगर, प्रकाश कांबळे, सुवर्णा पाटील, मुरलीधर शिंदे, लक्ष्मण माळी, धोंडीराम कदम, दाजी खोत, विलास गावंड आदी उपस्थित होते.