सांगली : शिराळा तालुक्यातील इतर गावातील गुऱ्हाळ उद्योग संपुष्टात आला असताना कणदूर येथील गुऱ्हाळ मालक सुभाष पाटील यांनी घरच्या लोकांच्या मदतीने तालुक्यातील एकमेव गुऱ्हाळघर टिकवून ठेवले आहे. चालू हंगामात तालुक्यात फक्त कणदूर येथेच गुळाची निर्मिती होताना दिसत आहे. गूळदरात होत असलेली परवड, कामगारांचा तुटवडा आणि वाढता उत्पादन खर्च अशा अनेक संकटांमुळे तालुक्यातील गुळ उद्योग संपुष्टात आला. वारणाकाठच्या बाकी सर्व गावात गुऱ्हाळघरांचे नामोनिशाण मिटले आहे. मात्र, हा उद्योग टिकवण्यासाठी सुभाष पाटील यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
पूर्वी शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरे प्रसिद्ध होती. तालुक्यात आरळ्यापासून देववाडीपर्यंतच्या दिवाळी ते गुढीपाडवा दरम्यान ही गुन्हाळघरे सुरू असायची. गावागावात शेकडो लोकांना रोजगार मिळायचा. असंख्य शेतकरी गुऱ्हाळ घरात नेऊन आपला ऊस गाळून गूळ बनवायचे व कराड, कोल्हापूरच्या बाजारपेठेत पाठवायचे. मात्र, नंतर गुऱ्हाळघरांना घरघर लागून कायमस्वरूपी बंद झाली. कणदूरमध्ये अगोदर ११ गुऱ्हाळघरे होती. विविध समस्यांमुळे ती बंद झाली. मात्र, सुभाष पाटील यांच्या गुऱ्हाळावर त्यांचे दोन भाऊ व घरातील इतर व्यक्तीही दररोज या कामांमध्ये व्यस्त असतात. बाहेरील काही मोजकेच लोक या गुऱ्हाळघरात काम करतात. पाटील यांनी स्वतःच्या शेतातील सर्व ऊस गुऱ्हाळघरात गळीत करण्याचे काम सुरू ठेवले आहे. पुरेसे कामगार नसतानाही त्यांनी चिकाटीने हा उद्योग चालवला आहे. चांगला दर व शासनाकडून प्रोत्साहन मिळाले तरच भविष्यात हा उद्योग टिकेल असे ते सांगतात.