सांगली : यंदा सततचा पाऊस, ढगाळ हवामानामुळे उसाची पुरेशी वाढ झाली नाही. याशिवाय जिल्ह्यातील उसाच्या लागवड क्षेत्रातही २० टक्के घट झाली आहे. त्यामुळे ऊस मिळवताना बहुतांश साखर कारखानदारांची दमछाक सरू आहे. यंदाचा गळीत हंगाम मार्चपर्यंत चालविणे कठीण झाल्याचे साखर कारखानदारांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत, गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांनी ४१ लाख ४४ हजार ३०१ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ४१ लाख ८२ हजार ४४४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ११ ते १२.८८ टक्क्यांपर्यंत राहिला आहे.
जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. जिल्ह्यात २०२३-२४ च्या गळीत हंगामात एक लाख ४४ हजार १२७ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये सात हजार हेक्टर क्षेत्राने घट होऊन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये एक लाख ३७ हजार १०४ हेक्टर झाले आहे. त्यामुळे जवळपास ८ ते १० लाख टनाने उसाचे गाळप घटण्याचाही जाणकारांचा अंदाज आहे. मान्सून आणि परतीचा मान्सून दोन्ही पाऊस जिल्ह्यात चांगले कोसळले. त्यानंतरही ढगाळ हवामान राहिल्याने वातावरणातील बदलामुळे उसाची पुरेशी वाढ झालेली नाही. याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर झाला आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम १५ मार्चपर्यंतच चालतील, असे साखर उद्योगातील जाणकारांचे मत आहे. याबाबत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सांगितले की, जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जवळपास १० हजार हेक्टरपर्यंत घटले आहे. यामुळे ऊस उपलब्ध करण्यासाठी सर्वच कारखान्यांची धावपळ सुरू आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.