सांगली: शिक्षणापासून ऊसतोड मजुरांची मुले वंचित राहू नयेत, दुर्लक्षित मजुरांच्या मुलांनाही शिकण्याची संधी मिळावी, शिक्षणापासून त्यांची मुले बाजूला राहू नयेत, यासाठी साखर कारखाना स्तरावर ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा भरवली जाते. यावर्षीही कारखान्याच्या वतीने साखर शाळा भरवण्यात येणार आहेत.साखर कारखान्याच्या वतीने ‘साखर शाळा’ चालविली जाते. कारखान्यामध्ये तात्पुरत्या स्तरावर शेड उभे करून शाळा भरविण्यात येणार आहे.
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणापासून बालके वंचित राहू नयेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये आपल्या कार्यक्षेत्रात अन्य तालुक्यांतून, जिल्ह्यातून येणाऱ्या स्थलांतरित ऊसतोड मजूर, वीटभट्टी, दगडखाण कामगार, तसेच अन्य कारणांमुळे येणाऱ्या मुलांना शिक्षणाची सुविधा सुरू करून देणे अनिवार्य आहे.
बीड तालुक्यातून ऊसतोडीसाठी दाखल होणाऱ्या शेतमजुरांची संख्या अधिक आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांचे सर्वेक्षण करून त्या मुलांना साखर शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविले जात आहे. सांगली जिल्हा परिषदेने यावर्षी ७० मुलांचे सर्वेक्षण केले. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर दरवर्षी येतात. या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर शाळा चालविणे बंधनकारक आहे.