सांगली : जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र २० हजार हेक्टरने वाढले

सांगली जिल्ह्यात यंदा, २०२३-२४ या गळीत हंगामात सुमारे १ लाख ४४ हजार १२८ हेक्टरवर उसाचे गाळप होणार आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवड क्षेत्र २० हजार हेक्टरने वाढले आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत असल्याने सरासरी क्षेत्रात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना योग्य ऊस तोडणीचे नियोजन करावे लागेल असे दिसते.

याबाबत ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात खासगी आणि सहकारी असे एकूण १८ साखर कारखाने आहेत. मात्र, गेल्या हंगामात चौदा कारखान्यांनी गाळप केले. आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठे महांकाळ या तालुक्यांतील चार कारखाने गेल्या तीन वर्षांपासून बंद राहिले. त्यामुळे या कारखान्यांनी गाळप केलेले नाही. आधीचे गाळप क्षेत्र सरासरी १ लाख ३७ हजार ८५२ हेक्टर असून आता १ लाख ४४ हजार १२८ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक उसाचे सरासरी क्षेत्र आहे. या तालुक्यात सर्वांत जास्त आडसाली ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यापाठोपाठ लागवड क्षेत्र कडेगाव, मिरज तालुक्यात आहे. यंदा जत तालुक्यातील डफळापूर श्रीपती शुगर हा कारखाना नव्याने सुरू झाला आहे. नागेवाडीचा कारखानाही सुरू होणार असल्याने एकूण १६ कारखाने गळीत हंगामात सहभागी होतील, असे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here