सांगली : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून राहिले आहे. दलदल झाली आहे. पाणंद रस्त्यांची अवस्थाही अतिशय बिकट बनली आहे. त्यामुळे सततच्या पावसामुळे ऊस तोडणीसाठी परिस्थिती सध्यातरी नसल्याने साखर कारखान्यांकडून सांगितले जात आहे. सद्यःस्थितीला पाऊस थांबला तर किमान दीड महिन्यानंतर शेतात वाफसा येईल अशी आताची अवस्था आहे. बहुतांश साखर कारखान्यांनी बॉयलर अग्निप्रदीपन केले आहे. मात्र, साखर आयुक्तांनी कारखान्यांना १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाचा परिणाम हंगामावर होऊ शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात १८ साखर कारखाने आहेत. हंगामात जिल्ह्यात १ लाख ३७ हजार १०३ हेक्टर उसाचे गाळप होणार आहे. सध्या राजाराम बापू, साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तीपेहल्ली हुतात्मा, क्रांती, सोनहीरा, रायगाव, दत्त इंडिया, श्री श्री रविशंकर, दालमिया, शुगर, मोहनराव शिंदे आरग, विश्वास चिखली, यशवंत खानापूर, एसईझेड तूरची, उदगिरी श्रीपती शुगर डफळापूर या साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी केली आहे. परतीच्या पावसाचा जोर कायम असून खरिपातील पिकांना फटका बसला आहे. रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसामुळे हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. स्वामिभानी शेतकरी संघटनेची २५ रोजी ऊस परिषद जयसिंगपूर येथे होणार आहे. तेथील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.