सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यांत सुरू हंगामातील ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा घटल्याने पाण्याची उपलब्धता पाहूनच शेतकरी ऊस लागवडीचे नियोजन करू लागले आहेत. जिल्ह्यातील आडसाली हंगाम आणि पूर्व हंगाम या दोन्ही हंगामातील ऊस लागवड पूर्ण झाली आहे. आडसाली उसाची ३६ हजार ८३ हेक्टर, तर पूर्व हंगामाचे १८ हजार ९९३ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. पुढील वर्षी गाळपाला चालणाऱ्या उसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. जिल्ह्यात आडसाली, पूर्व हंगाम आणि सुरू हंगामातील ८३ हजार ७९८ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी भागातदेखील परतीचा आणि मान्सूनोत्तरी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाणीसाठा वाढला. सिंचन योजनांचे पाणीही सोडले जात आहे. त्यामुळे जत, आटपाडी कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी पुढे येऊ आले आहेत.