सांगली : नागेवाडी येथील भारती शुगर्स अण्ड फ्युएल्स कार्यस्थळावर 2025-26 गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या करारांना प्रारंभ झाला. भारती शुगर्सचे चेअरमन ऋषिकेश लाड व कारखान्याचे मार्गदर्शक महेंद्र अप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांच्या उपस्थितीत तोडणी वाहतूक कंत्राटदार व वाहन मालकांच्या हस्ते करारपत्रांचे पूजन करण्यात आले. शेती अधिकारी संजय मोहिते यांनी स्वागत केले. यानंतर पहिले ११ करार करणाऱ्या वाहन मालकांचा सन्मान आर. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पाटील म्हणाले, नवीन गळीत हंगामाची तयारी सुरू असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंद घेण्याचे काम शेती विभागामार्फत वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उसाची नोंद त्वरित करावी. ऊस तोडणी व वाहतुकीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तसेच कारखान्यामार्फत तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांचे हित नक्कीच जपले जाईल. कार्यक्रमाला फायनान्स मॅनेजर प्रवीण पाटील, चिफ केमिस्ट विकास सूर्यवंशी, चिफ इंजिनिअर मोहन पाटील, सिव्हिल इंजिनिअर गाढवे साहेब, परचेस ऑफिसर अविनाश स्वामी, ई.डी.पी. मॅनेजर माणिक पाटील, ऊस पुरवठा अधिकारी विशाल पाटील, सुजित मोरे, जितेंद्र डुबल, एच. आर. असिस्टंट प्रसाद सुतार उपस्थित होते.