सांगली : विश्वासराव नाईक कारखान्यात ऊस तोडणी, वाहतुकीचे करार

सांगली : येत्या गळीत हंगामात विश्वास कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करून अपेक्षित साडेसात लाख टन उसाचे गाळप करेल. नव्या बदलात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीचे ज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले. चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगाम २०२५-२६ साठी तोडणी-वाहतूक करारप्रसंगी बोलत होते. विराज नाईक व कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते कराराचा प्रारंभ झाला.

संचालक नाईक म्हणाले, “पावसाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन हंगामात कारखानदारीपुढे अनेक अडचणी आल्या. येत्या हंगामात त्या येणार नाहीत, असे गृहीत धरून नियोजन केले आहे. उसाची उपलब्धता कारखाना कार्यक्षेत्रात कशी जास्तीत जास्त होईल, याकडे लक्ष दिले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान व माहिती दिली जात आहे. ठिबक सिंचनाचा वापर वाढावा, यासाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांत जागरुकता निर्माण केली जात आहे. शेती विभागामार्फत ‘समृद्ध शेतकरी अभियान’ राबविले जात आहे.”

शेती अधिकारी ए. ए. पाटील यांनी स्वागत केले. कराराचा मुहूर्त संचालक विराज नाईक व कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते झाला. केलेले करार ऊस वाहतूक ठेकेदार जयवंत पाटील (सरुड), दतात्रय ठकार (इंप्रुळ), नारायण पाटील (कणदूर), प्रतीक शिराळकर (बिळाशी), विठ्ठल खामकर (सरुड) सुपूर्द करण्यात आले. कामगार संचालक दत्तात्रय पाटील, खातेप्रमुख, विभागप्रमुख, शेती विभागातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here