सांगली : ‘स्वाभिमानी’ने १०० हून अधिक ऊस वाहतुकीची वाहने रोखली


सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडेगाव तालुक्यात शंभरहून अधिक ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली. कार्यकर्त्यांनी २० हून अधिक वाहनांची हवा सोडली. गेल्यावर्षी गाळपास आलेल्या उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा आणि चालू गळीत हंगामातील उसाला प्रती टन ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कडेगाव तालुक्यात संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे.

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदर आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. गुरुवारी कडेगाव, तडसर, हिंगणगाव खुर्द येथे ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरली. वीसपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडली. वाहन चालक, शेतकऱ्यांना ऊसदराचा प्रश्न मिटेपर्यंत ऊस तोडणी बंद ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या मागण्यांसाठी वारंवार आदोलने केली आहेत. मात्र, साखर कारखान्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता आर या पारची भूमिका घेऊन आंदोलन केले जात आहे. या आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्वाभिमानीचे इम्रान पटेल, बाळासाहेब जाधव, धनाजी माळी, दिनकर माळी, चंद्रकांत देशमुखे, विलास कदम, जगदीश पोळ, अनंत जंगम, अजमुद्दीन मुजावर यांच्यासह पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here