सांगली : जिल्ह्यात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात नदीकाठासह दुष्काळी पट्ट्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढतेय. उसाच्या क्षेत्राबरोबरच जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढून १९ झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात सिंचन योजनांचे पाणी पोहोचल्याचा हा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत तब्बल १४ हजार २३४ हेक्टरने ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका उसाला बसला तरी शेतकरी लागवडीसाठी पुढे येत आहेत.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढले आहे. परंतु शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यांतील ऊस क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये ऊस लागवड क्षेत्र एक लाख २२ हजार ८६९ हेक्टर होते. आता त्यात १४ हजार २३४ हेक्टरने वाढ होऊन सध्या ऊस क्षेत्र एक लाख ३७ हजार १०३.९६ हेक्टर झाले आहे. येत्या गळीत हंगामात जिल्ह्यात एक लाख ३७ हजार १०३.९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे. भाजीपाल्यासह अन्य पिकांचे उत्पादन घेतले तर त्याला खात्रीशीर बाजारपेठ नाही. दराची हमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून वाळवा, पलूस, शिराळा, कडेगाव तालुक्यांसह दुष्काळी तालुक्यातील शेतकरीही ऊस लागणीकडे वळल्याचे सांगली जिल्ह्यातील चित्र आहे.