सांगली : पुढील काळात उसाची उपलब्धता पाहता आता साखर कारखानदारीचे हंगाम १०० ते १२० दिवसापर्यंत चालतील असेच चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कमी कालावधीत जास्तीचे गाळप करणे, हा एकमेव पर्याय कारखानदारांपुढे राहील. त्याचा विचार करून विश्वासराव नाईक साखर कारखान्याने आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी दोन वर्षांत ‘विश्वास’ कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी दहा हजार टन करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा) येथे कारखान्याच्या हंगाम २०२४-२५ च्या सांगता समारंभात ते बोलत होते.
अध्यक्ष नाईक म्हणाले की, पुढील वर्षी प्रतिदिनी एकूण साडेसात हजार टनाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पाच ते साडेपाच हजार टनाच्या गाळपातून साखर निर्मिती तर २ हजार टनाच्या गाळपातून इथेनॉल किंवा ई. एन. ए. निर्मिती होईल. त्यासाठी आसवनी प्रकल्पाचा बॉयलर व टर्बाईन वेगळे राहील. सह विजनिर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढ करून २२ मेगावॉट निर्मिती होत आहे. आसवनी प्रकल्प क्षमता प्रतिदिनी १ लाख ५ हजार लिटरवर नेली आहे. ती भविष्यात १ लाख ८० हजारांपर्यंत नेऊ. यावेळी, संचालक विराज नाईक यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. सौ. जोती व संचालक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते साखर पोती पूजन व महापूजा झाली. शेती समितीचे अध्यक्ष संचालक शिवाजी पाटील यांनी स्वागत केले. तोडणी, वाहतूकदार, ठेकेदार यांचा सत्कार अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.