सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली ऊस दराची कोंडी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या समुहाने फोडली आहे. कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरुल आणि कारंदवाडी युनिटकडील हंगाम २०२४-२५ मधील ऊसाला ३२०० रुपये पहिला हप्ता दिला जाणार आहे अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी दिली. कारखान्याच्या जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. चालू हंगामामधील अंतिम दर अंदाजे ३२७५ रुपये अपेक्षित असून उर्वरित रक्कम दिपावलीच्या सणास देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखाना व्यवस्थापनाने एकूण २२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. साखराळे युनिटकडे ९ लाख ५० हजार मे.टन, वाटेगाव- सुरुल युनिटकडे ५ लाख मे.टन, कारंदवाडी युनिटकडे ४ लाख ५० हजार मे.टन तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडे ३ लाख असे एकूण २२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट आहे. सर्व ऊस उत्पादक व सभासद यांनी पिकविलेला सर्व ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे. यावेळी उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदिपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौंटंट संतोष खटावकर उपस्थित होते.