सांगली : एआय तंत्रज्ञान शेतकाऱ्यांच्या बांधापर्यंत घेऊन जाणारा विश्वास कारखाना राज्यातील पहिला आहे. उसापासून केवळ साखरनिर्मिती, हे उद्दिष्ट नसून त्यापासून विविध उपपदार्थ निर्मिती करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना अधिकचा दर देणे शक्य होत आहे. त्यासाठी आणखी विविध उपपदार्थ निर्मिती व टप्प्याटप्प्याने कारखान्याची गाळपक्षमता १० हजार टनापर्यंत नेणार असल्याची माहिती विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये दिली.
कारखान्यातर्फे ऊस शेतीमधील तज्ज्ञांना समवेत घेऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन, शेतकरी मेळावे, परिसंवाद आदींद्वारे प्रबोधनाचे काम केले जात आहे. पुढील काळामध्ये पारंपरिक ऊस शेतीला बगल देऊन आधुनिक ऊस शेतीसाठी कारखान्यामार्फत निवड करून त्यांना संपूर्ण मार्गदर्शन व निविष्ठा पुरवण्याचा मानस आहे. काळाची पावले व कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) साखरेच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये मागे न राहता शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करून डोंगराळ व दुर्गम भागातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी होईल, यावर भर आहे.
शिराळा व शाहूवाडी तालुका कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. ऊस विकासाच्या योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये ठिबक सिंचनासाठी अर्थसहाय्य व एकरी पाच हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, हिरवळीची खते, वियाणास ५० टक्के अनुदान, बांधपोच कंपोस्ट, माफक दरात माती व पाणी परीक्षण, गांडूळ खत उत्पादन, दर्जेदार ऊस बियाणे व ऊस रोपे पुरवठा, माफक दरात जीवाणू द्रवरूप खते, पतीवर (क्रेडिट) रासायनिक खतांचा पुरवठा यासंह अन्य काही योजना अतिशय प्रभावी पद्धतीने राबवल्या जात आहेत.
चालू हंगामात ४ लाख ४३ हजार १६ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ५ लाख ३५ हजार २० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. १२.०३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. येत्या हंगामात ७ हजार ५०० टन प्रतिदिनी क्षमतेने गाळपाचे उद्दिष्ठ आहे. आसवणी प्रकल्प १ लाख ५ हजार लिटर प्रतिदिनी क्षमता असलेला आसवणी प्रकल्प आहे. नुकत्यास संपलेल्या हंगामात ७३ लाख ८६ हजार ९३० लिटर स्पिरीटचे उत्पादन घेतले आहे. त्यासाठी २५४५४.०९४ टन मळीचा वापर झाला. २९०.२ टक्के उतारा मिळाला आहे. कारखान्याकडे १५ मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पातून २०२४-२५ हंगामात ४ कोटी १३ लाख ५६ हजार ३४८ युनिट वीजनिर्मिती झाली. २ कोटी ५४ लाख ४६ हजार ४०८ विक्री केली आहे. १ कोटी ६२ लाख ०९ हजार ९४० स्ववापर झाला आहे.