सांगली : जिल्ह्यात ऊस वाहतूक दरात वाढीसाठी सुरू असलेला ऊस वाहतूकदारांचा संप तूर्त स्थगित करण्यात आला आहे. सर्व कारखान्यांच्या संचालकांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. याबाबत, आज, शुक्रवारी (19 जानेवारी) दुपारी पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ऊस वाहतुकदारांनी गेले चार दिवस रस्त्यावर उसाने भरलेले ट्रॅक्टर, ट्रक थांबवून आंदोलन सुरू केले होते. वाहतूक दरवाढीसह अन्य मागण्या त्यांनी केल्या होत्या. मात्र कारखान्यांनी भूमिका स्पष्ट केली नव्हती.
ऊस वाहतूकदारांच्या संपामुळे बलवडी फाटा, तासगाव यासह शिगाव परिसरात वाहने थांबून होती. तासगाव कारखान्याचे आर. डी. पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी वाहतूकदार संघटनेच्या काही सदस्यांची भेट घेतली. यावेळी सर्व कारखान्यांच्या संचालकांशी फोनवर बोलणे झाले. यावर कारखान्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय सर्व संघटनांनी घेतला. दुपारपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करू, असा इशारा वाहतूक संघटनेने दिला आहे.