सांगली : पाच लाख टन गाळप करून हुतात्मा कारखान्याच्या ऊस हंगामाची सांगता

सांगली : गेल्या सात वर्षांत सहा वेळा उसाची एफआरपी वाढली. मात्र एमएसपी एकदाच वाढली. दिवसेंदिवस कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढतोय. मात्र एमएसपी वाढत नाही. कारखाने आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्री दर ४२ रुपये करावा अशी मागणी हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली. कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ५ लाख टनाहून अधिक उसाचे गाळप केले. या कार्यक्रमात गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये सर्वाधिक ऊस तोडणी, वाहतुकीचे काम करणाऱ्या प्रथम तीन बैलगाडी, ट्रॅक्टर अंगद व तोडणी मशीन कंत्राटदार, वाहनमालक व मुकादमांचा सत्कार करण्यात आला.

क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमापूजनाने सांगता सभेची सुरवात झाली. यावेळी अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी आपले उसाचे क्षेत्र मर्यादित असल्याने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या प्रतीचे ऊस बेणे, रोपे वापरून प्रतिएकरी उसाचे उत्पन्न वाढवायला पाहिजे. क्षारपड जमीन क्षेत्रात निचरा प्रणाली राबवून हाताखाली घेतले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमात कारखान्यास अखंडित, नियमित ऊस पुरवठा व उत्कृष्ट तांत्रिक कामकाज केल्याबद्दल सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. यावेळी गौरव नायकवडी, वीरधवल नायकवडी, केदार नायकवडी व संचालक, कार्यकारी संचालक, सभासद उपस्थित होते

 

महत्त्वाच्या बातम्या: 

सोलापूर : ऊस बिले थकविणाऱ्या विभागातील १७ साखर कारखान्यांना आयुक्तांकडून नोटिसा

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here