सांगली : जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचे धुराडे पेटले आहे. वाळवा तालुक्यात ऊस कार्यक्षेत्र असणारा कृष्णा, राजारामबापू, हुतात्मा तसेच अन्य तालुक्यांतील क्रांती, वारणा या कारखान्यांनी ऊस गाळप चालू केले आहे. काही ठिकाणी यंत्रांद्वारे, तर काही ठिकाणी मजुरांकडून ऊसतोड चालू आहे. मागील आठवड्यापासून बहे, येडेमच्छिंद्र, शिरटे, हुबालवाडी, नरसिंहपूर परिसरात विविध कारखान्यांच्या ऊसतोडी चालू झाल्या आहेत. बैलगाडी, अंगद, ट्रॅक्टर-ट्रॉल्या ऊस भरून जात आहेत. परंतु जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने अद्याप चालू गळीत हंगामातील ऊसदर जाहीर केलेला नाही.
ऊस दरासाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना, रघुनाथ पाटीलप्रणित शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटना अशा सर्वच संघटनांनी भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे संघटनांची धार बोथट झाली की काय, अशी चर्चा शेतकरी करू लागले आहेत. मागील आठवड्यात बहे परिसरात तसेच अन्य काही ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेने उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडी, अंगदच्या टायरमधील हवा सोडणे, फडात जाऊन ऊसतोड बंद पाडणे, असे आंदोलन केले. हा अपवाद वगळता तालुक्यात अन्यत्र कोठेही आंदोलन दिसले नाही. जोपर्यंत उसाला दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन करूनही तालुक्यात सर्वत्र ऊसतोडी चालू आहेत. ‘स्वाभिमानी’सह सर्वच शेतकरी संघटनांनी अद्याप ऊस दराबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.