सांगली : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेती क्षेत्रात सुरू झाला आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनीही बदलण्याची गरज आहे. तंत्रज्ञान वापराने ऊस शेतीत क्रांती घडेल, असे प्रतिपादन क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना व अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (बारामती) चे कृषी विज्ञान केंद्र यांच्या विद्यमाने ‘ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमतेचा वापर’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. आमदार अरुण लाड, डॉ. तुषार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतीत अचूक व्यवस्थापन होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचा वापर करणे फायदेशीर आहे. कृषी विज्ञान केंद्र (बारामती) तीन वर्षे या विषयावर अभ्यासपूर्ण प्रात्यक्षिक घेत आहे. पाणी व्यवस्थापनासाठी आय. ओ.टी. मॉइश्चर सेन्सर, स्वयंचलित हवामान केंद्र, उपग्रह प्रणाली आणि ड्रोन इमेजनरी तंत्रज्ञान इत्यादींचा वापर केला जाणार आहे. ए. आय. तंत्रज्ञान वापरामुळे पिकाला पाण्याची गरज, रोग-किडीची ओळख व पूर्वसूचना, पिकाच्या वाढीचा निर्देशांक यांची बिनचूक माहिती मिळणार आहे.
मॅप माय क्रॉप सॅटेलाइटचे तज्ज्ञ अरुण पडूळ यांनी उपग्रह प्रणालीच्या ऊस शेतीमधील वापराची चित्ररूप माहिती दिली. फायलो स्मार्ट इरिगेशनचे प्रमोद चौंडीकर यांनी आय.ओ.टी. संवेदकाबद्दल माहिती सांगितली. आमदार अरुण लाड म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस क्षेत्रातील वापर ही नव्या हरितक्रांतीची सुरवात आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ याही तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीत शेतकऱ्यांनी करून एकरी उत्पादन वाढवावे.” कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, आजी-माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी तसेच कारखान्यातील अधिकारी उपस्थित होते. विलास जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुभाष वडेर यांनी आभार मानले.