सांगली : विराज केन्स अँड एनर्जी या गूळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्याने अल्पावधीत कारखान्याने गूळ उत्पादनामध्ये दक्षिण भारतात नावलौकिक मिळवला आहे. प्रतिदिनी ७५० टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गूळ पावडर तयार केली आहे. गत आठ वर्षांपासून दर्जेदार गूळ पावडर केली जाते. कारखान्यात उत्पादित गूळ पावडर देशाच्या कानाकोपऱ्यात विक्री केली जाते. शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देता यावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती विराज केन्सचे कार्यकारी संचालक विशाल पाटील यांनी दिली.
कार्यकारी संचालक विशाल पाटील म्हणाले की, २०१७ मध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळसंद (ता. खानापूर) येथे कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. १८ जानेवारी २०१८ मध्ये गूळ पावडर निर्मितीच्या प्रत्यक्ष उत्पादनास प्रारंभ झाला. केरळ राज्यातील देवस्थानचा प्रसाद तयार करण्यासाठी गुळ पावडरला अधिक मागणी आहे. आमची गुळ पावडर केमिकलमुक्त आहे. त्यामुळे वैद्यरत्न आणि पतंजली या आर्युवेदिक औषध निर्माण करण्यासाठी गुळ पावडर उत्पादनास मागणी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अॅपद्वारे नोंदणी केली जाते. कारखान्याला आठ वर्षांत सरासरी १२.५० चा उतारा मिळाला आहे. या वर्षी सरासरी १३ टक्के उतारा मिळाला आहे.