सांगली : ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र दुष्काळ अन् अतिवृष्टीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी ऊस कापून जनावरांना चारा म्हणून घालत आहेत. शेतकऱ्यांनी चारा टंचाईवर वापरलेल्या या पर्यायाचा साखर कारखान्यांना चांगलाच दणका बसणार आहे. चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. दरवर्षी थोड्याफार फरकाने अशी स्थिती असते. परंतु, यंदा वारणा, कृष्णा नदीकाठावर याचे प्रमाण अधिक असणार आहे.
यावर्षी कारखान्यांना उसाची टंचाई भासणार आहे. ऊसासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार हे गृहीत धरुन कारखान्यांनी दर जाहीर करण्याकरिता अद्यापही हात आखडता घेतला आहे. हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी कारखान्याकडून केली जात आहे. ऊस तोडणी कामगारांचे करार पूर्ण करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, उत्पादनात होणारी घट, कारखान्यांची वाढलेली संख्या व वाढलेली गाळप क्षमता, शेतकऱ्यांचा ऊस शेतीकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन याचा परिणाम आगामी गाळपावर होणार आहे. कारखान्यांकडून ऊस जास्तीत जास्त आपल्याकडे नेण्याची स्पर्धा लागणार आहे. यातून जास्त दराचेही आमिष दाखवले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल अशी स्थिती आहे.