फोंडा : संजीवनी साखर कारखान्याने ८९ लाख रुपये किमतीचे हार्वेस्टिंग मशीन स्क्रॅपमध्ये जाण्यापासून वाचवले आहे. २०१० मध्ये याच्या खरेदीनंतर ते मशीन एक दशकभर वापराविना पडून होते. मार्च २०१४ मध्ये याची लिलाव प्रक्रिया सुरू केल्यानंतर मशीनसाठी कारखान्याला कोणी खरेदीदार मिळाला नव्हता. मात्र, कारखान्याचे प्रशासक सतेज कामत यांनी मशीन वापरात आणण्यासाठी अखेरचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. बॅटरी बदलणे, काही भागांची दुरुस्ती अशा किरकोळ सर्व्हिसिंगनंतर मशीन पुन्हा सुरू झाली आहे. आता ऊस तोडणी प्रभावीपणे केली जात आहे.
या एसएम १५० टीबी ऊस हार्वेस्टर मशीनला २०१४ मध्ये ८९ लाख रुपयांना लिलावात समाविष्ट करण्यात आले होते. सतेज कामत यांनी सांगितले की, मशीन विविध कारणांनी गेली दहा वर्षे वापरात नव्हते. शेतकरी याचा वापर करण्यास तयार नव्हते. हे मशीन तोडणीसाठी उपयुक्त नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.
मात्र, अलिकडेच संजीवनी साखर कारखान्याच्या मालकीच्या शेतात तोडणीवेळी मशीनमुळे एक लाख रुपयांची बचत झाल्याचे दिसून आले. कामगारांच्या मदतीने ऊस तोडणी करण्यापेक्षा मशीनचा खर्च २५ टक्के कमी असल्यावर कामत यांनी भर दिला.