अहिल्यानगर : येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी संचालक शंकरराव हाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागी संचालक मंडळाने शंकरराव चव्हाण यांची एकमताने निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक शुभांगी गोंड यांनी काम पाहिले.
निवडीबद्दल ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे व चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला आहे. नूतन उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण म्हणाले की, कर्मवीर स्व. शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. ही परंपरा चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या माध्यमातून पुढे सुरु आहे. मला संधी दिली त्याबद्दल माजी आमदार काळे, आ. काळे व सर्व संचालकांचे आभार मानतो. यावेळी मावळते उपाध्यक्ष डॉ. मच्छिद्र बर्डे यांनी सांगितले की, कर्मवीर शंकरराव काळे, माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धती व सहकायातून जबाबदारी पार पाडता आली. यावेळी प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संतोष शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते.