सोलापूर : संत दामाजी साखर कारखान्याने येत्या गळीत हंगामात पाच लाख ऊस गाळप करण्याचे नियोजन केले आहे. दुष्काळीपट्ट्यात असून, कोणतेही सहप्रकल्प नाहीत. असे असतानादेखील गतवर्षी २७०१ रुपये दर दिला आहे. यंदाही आसपासच्या कारखान्यांच्या बरोबरीने उसाचा दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी यंत्रणा वाहतूक तोडणे, कर्मचारी यांच्या मदतीने हे आव्हान पार पाडू, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरन शिवानंद पाटील यांनी केले. साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडली. व्यासपीठावर धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, रामचंद्र वाकडे, रामचंद्र जगताप, शिवाजीराव पवार यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
सभेत रामचंद्र वाकडे यांनी चेअरमन स्व. मारवाडी वकील व व्हा. चेअरमन स्व. रतिलाल शहा यांच्याबरोबरीनेच स्व. चरणूकाका पाटील यांचे कारखान्यासाठी योगदान मोठे होते. त्यांचा पुतळा कारखाना साईटवर बसवण्याचा ठराव मांडला. चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले की, केंद्राच्या एनसीडीसी योजनेंतर्गत कारखान्याला ९४ कोटी रुपयांचे नऊ टक्के व्याजदराचे आठ वर्षांच्या परतफेडीवरील कर्ज उपलब्ध झाले आहे. ओटीएस तत्त्वावर अनेक संस्थांची जुनी देणी देण्यात आम्हाला यश आले आहे. कर्मचाऱ्यांचा ३२ महिन्यांचा थकीत प्रॉव्हिडंट फंडदेखील भरला आहे आहे. संजय कट्टे, लतीफ तांबोळी, दामोदर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी विषय वाचन केले. संचालक प्रा. रेवणसिद्ध लिगाडे, शिवाजीराव नागणे, अॅड. भारत पवार, जालिंदर व्हनुटगी, नितीन पाटील, दत्ता भाकरे, रणजितसिंह पाटील, सिध्देश्वर डोके, राजेंद्र बेदरे, बंडोपंत बेदरे, हेमंत निकम, दौलत माने, मनोज चव्हाण, धोंडीबा सावंत उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.