सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधी गटात जागा वाटपावरून फूट पडल्याने दुरंगी ऐवजी तिरंगी लढत होणार असल्याचे अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. निवडणुकीसाठी दाखल २१४ पैकी १४४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे २१ जागांसाठी ७० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना सोमवारी (ता. २४) चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात चिन्हांचे वाटप होईल.
निवडणुकीसाठी २१४ उमेदवार पात्र ठरले होते. अर्ज माघारीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. मात्र, विरोधी गटात मेळ न बसल्याने त्याच्यात फूट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे २१ जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी त्याची अंतिम यादी जाहीर केली. अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनेलमधून पाटील यांच्यासह अण्णासो पाटील, संभाजी साळवे, सुरेश माने, विजय निकम, संजय गोरे, जयंत जाधव, सुनील जगदाळे, नेताजी चव्हाण, राजेंद्र पाटील, संतोष घार्गे, अरविंद जाधव, राजेंद्र चव्हाण, कांतिलाल भोसले, रमेश माने, राहुल निकम, दीपक लादे, सिंधूताई पवार, लक्ष्मी गायकवाड, संजय कुंभार, दिनकर शिरतोडे, संजय चव्हाण, राजेंद्र माने, संदीप पाटील, राजेंद्र जाधव बाळासो माने आदींचा समावेश आहे.