सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाकरीता गळीतास येणाऱ्या उसास २ हजार ७०० रुपये पहिली उचल म्हणून जाहीर केले आहेत. तसेच ही रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व चेअरमन यशराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने नियोजन केले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून नियमित सुरु झालेला आहे. आजअखेर कारखान्याने ८४ हजार २२५ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून आज अखेर ११.३३ टक्के सरासरी साखर उतारा मिळालेला आहे. चालू गळीत हंगामामध्ये साखरेचे दर हे जवळपास ३ हजार ३०० ते ३ हजार ४०० रूपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत.
गतवर्षी कारखान्याने २ हजार ५०० रूपये पहिली उचल अदा केलेली होती. चालू वर्षी बँकेकडून उत्पादित होणाऱ्या साखरेवर मिळणारी प्रति क्विंटल उचल व गळीत हंगामामध्ये अनुषंगिक खर्च पाहता आपल्या कारखान्याने गळीतास येणाऱ्या उसास पहिली उचल म्हणून २ हजार ७०० रूपये प्रतिटन याप्रमाणे देणेचे नियोजन केले असून एफआरपीप्रमाणे होणारी उर्वरित रक्कम निधीची उपलब्धता होताच अदा केली जाणार आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी संपूर्ण ऊस हा कारखान्यास देऊन द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.