सातारा : ६ लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादन करून ‘अजिंक्यतारा’च्या गळीत हंगामाची सांगता

सातारा : शेंद्रे येथील माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना साताऱ्यासह आसपासच्या तालुक्यांतील हजारो शेतकरी, कामगार, ऊस तोडणी मजुरांचे सुखाचे संसार चालवत कारखाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाला आहे. कारखान्याने अडचणीचा काळ असताना अत्यंत नेटके, काटेकोर नियोजन, कामकाज करून १०८ दिवसांत १२.६७ टक्के एवढ्या उच्चतम उताऱ्याने ६ लाख २५ हजार ५२५ किंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२४-२५ची सांगता ११ साखर पोत्यांच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, हा हंगाम ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद यांच्या सहकार्यामुळेच यशस्वी झाला आहे. यापुढेही आपल्या सर्वांचे सहकार्य कायम राहू द्या. कारखान्याने सभासद शेतकऱ्यांची विश्वासाहर्ता मिळवली आहे. उच्च दर देण्याबरोबरच गाळपास येणाऱ्या उसाला वेळेत पेमेंट देणारा कारखाना असा आपल्या कारखान्याचा नावलौकिक आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगार, कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. व्हा. चेअरमन नामदेव सावंत यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला आजी-माजी संचालक, अजिंक्य उद्योगातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here