सातारा : सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप – प्रत्यारोप

सातारा : सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप – प्रत्यारोपाच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. आमच्या लढ्यामुळेच २,२२१ सभासदांना न्याय मिळाला. सह्याद्री सभासदांच्या हक्काचा आहे तो त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे, असे प्रतिपादन निवासराव थोरात यांनी केले. थोरात म्हणाले, (के.) यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सहकारातील निवडणूक समविचारी लोकांना सोबत घेऊन लवाष्पाची आमची नेहमी भूमिका होती. मात्र, विद्यमान आमदारांनी आमच्यावर कटकारस्थान केली. आम्हाला अंधारात ठेऊन एका बाजूला पूर्ण पॅनेल उभे केले आणि दुसऱ्या बाजूला चर्चा सुरू ठेवल्या. तुम्हाला निवडणूक लढायची होती, तर समोरासमोर येऊन लढायला पाहिजे होते. कारखान्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना बाजूला ठेवले. शेतकरी सभासदांना देशोधडीला लावण्याचे काम विद्यमान संचालक मंडळाने केल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी सागर शिवदास, सुदाम चव्हाण, भीमराव डांगे, शिवाजी कव्हाण, अमित जाधव, अविनाश नलवडे, विश्वास जाधव, भाऊसाहेब घाडगे, संग्राम पवार यांची उपस्थिती होती, तर भौमराव पाटील, संपतराव माने, डॉ. सत्यजित काळभोर, सचिन नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी पॅनेलचे सर्व उमेदवार व उसउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सह्याद्री’ची निवडणूक केवळ राजकीय स्वार्थासाठी : आमदार डॉ. विश्वजित कदम

विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लावली, अशी टीका आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केली. सह्याद्रि कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव) येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी पी. डी. पाटील पॅनेलचे प्रमुख, तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार अरुण लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कदम म्हणाले, पी. डी. पाटील यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रि साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला आहे. कारखान्याने सभासदांना चांगला ऊसदर दिला आहे. कारखान्याच्या माध्यमातून वेळोवेळी सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा चांगल्या चालणाऱ्या कारखान्याची निवडणूक लागणे, ही खरी चूक आहे. या निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनेलला कडेगाव तालुक्यातून मोठे मताधिक्य देऊ. पी. डी. पाटील पॅनेलच्या पाठीशी संपूर्ण कडेगाव तालुका खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही डॉ. कदम यांनी दिली. माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु अपघाताने आमदार झालेल्यांनी या कारखान्याची निवडणूक लावली. अशा व्यक्तींना सभासद त्यांच्या भाषेत उत्तर देतील. यावेळी प्रशांत यादव, जितेंद्र पवार, विलास यादव, महेंद्र करांडे, लक्ष्मण पोळ यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक आशिष घार्गे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here