सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली. त्यात सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत २१-० ने दणदणीत विजय मिळवला. काल, संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड झाली. अध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, तर उपाध्यक्षपदी कोरेगावचे माजी उपसभापती कांतिलाल भोसले-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, प्रणव ताटे, लालासाहेब पाटील, लक्ष्मी गायकवाड, सुरेश माने, संगीता साळुंखे, सर्व नूतन संचालक, माजी संचालक, सभासद उपस्थित होते. लालासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष पाटील यांनी आभार मानले.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. ईव्हीएम मशिनवरील आक्षेपांमुळे ‘बॅलेट पेपर’वर मतदान करण्याची मागणी पुन्हा सोशल मीडियात जोर धरू लागली आहे. दरम्यान, अध्यक्षपदी निवडीनंतर अध्यक्ष पाटील म्हणाले, सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी अपप्रचार केला. काही खोट्या घोषणाही केल्या. कारखान्याच्या कर्जाबाबत अपप्रचार पसरवला, खालच्या पातळीवर टीका झाली, त्याला सभासदांनी निवडणुकीच्या माध्यमातून मतांच्या रूपाने समर्पक उत्तरे दिली आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून जो विश्वास सभासदांनी दाखवला, त्यास पात्र राहून चांगल्या प्रकारचे काम करू.”